Friday 9 September 2016

रस्त्यावरची खरेदी आणि खाणं...

खरेदीची अगदीच फार म्हणावी, अशी काही कधी जास्त आवड नव्हतीच. एरवी शाळेत जाताना एखादी पेन्सिल किंवा ऎन परिक्षेवेळी घ्यायचे असणारे HERO चे फाउटंन पेन किंवा आणखी दुसरे काही घ्यायचे असले तरी ते नकोसे वाटायचे, अगदी जीवावर यायचे. कारण सरळ असायचे, दुकानात गेले की तिथे गर्दी असणार आणि तिथे हा दुकानदार वेळ लावणार आणि मग आपण तिथे आपला नंबर कधी येणार ह्यासाठी वाट बघत उभे रहायचे, जे की फार काही आवडत नसायचे. एवढं साधं, सोपं आणि सरळं असं ते गणित होतं. हा आता यामध्ये शाळा भरतानांची खरेदी मात्र याला अपवाद ठरायची, पण तीही फार क्वचितचं.

अशी खरेदीची फार काही आवड नसली, तरी अकरावी, बारावीचे कॉलेज लाईफ सुरु झाल्यावर मात्र आपोआपच हळुहळु एक-एका गोष्टींची जबाबदारी आपसुकच घेणे भाग पडले, कारण तोपर्यंत सर्व काही अगदी वेळेवर न सांगता आपोआप होत होते. पण आता मात्र खरीखुरी सुरुवात झाली ती वह्या-पुस्तकांच्या खरेदी पासुन. कारण आता सगळेच वेगळे होते, घ्यायची चारच पुस्तके पण त्यांची दहा प्रकाशन. आणि यातुन कॉलेजच्या खरेदीपासुन खरेदीच्या शिक्षणांची खरी शाळा सुरु झाली, आणि मनातली खरेदीची भीती निघुन गेली.

पण ही खरेदी तशी अगदीच किरकोळ किंवा म्हणावी तेवढं शिकवणारी नक्कीच नव्हती, असं आत्ता विचार केला तर वाटत. पण तेव्हासाठी मात्र ते सारं खुप काही शिकवुन गेलं. आता हळुहळु एकमेकांमध्ये लपुन बसलेल्या अशा सुप्त गुण-अवगुण किंवा खरेदी करतानाचे कलागुण दिसुन यायला लागले आणि त्यांची पारख होऊन ओळख पटायला सुरुवात झाली.

पुढे लवकरच ह्या-ना-त्या कारणाने, नाहीतर उगाचच फिरायचे म्हणुन सुद्धा सगळ्या सोबत म्हणजेच मग त्यामध्ये कॉलेजचे किंवा शाळेतले असे मित्र-मैत्रीणीसोबत निघायचे. कित्येकदा तर कोणाला काहीच घ्यायचे नसायचे, पण एखादी गोष्ट आवडली म्हणुन बघायची, त्यांची किंमत विचारायची, आणि अशावेळी आपल्याला ती वस्तु घ्यायची नाही म्हनुन भरपुर कमी किंमतीमध्ये मागायची. असे बरेच खेळ चालायचे आणि बर्‍याचदा म्हणजे सुरुवातीला तर ते खेळ आमच्यावरच पलटी व्हायचे. मग कधी-कधी पैसे असतील तर ती वस्तु गपचुप घ्यायची, कारण त्याशिवाय काही पर्याय नसायचा. कारण अशा खरेदीचे ठिकाण नेहमीच पुण्यातील अस्सल पेठ आणि मंडईचाच भाग असायचा. तर कधी पैसे नाहीत म्हणत तिथुन निघुन जायचे आणि पुढे येऊन जोर-जोराने त्या दुकानदारांच्या expression आणि barging वर एकमेकांना किस्से सांगत हसायचे. अशा प्रकारांमध्ये कित्येकदा नको असलेल्या कितीतरी वस्तु घेतल्या आणि परत ती कोणी न्यायची यांची पंचाईत व्हायची.

नंतर बर्‍यापैंकी खरेदी करतानाचे मार्केट समजायला लागले होते, तेव्हा एकाने त्यातल्या त्यात थोडी अक्कल लावली, आणि दुकानदार फारच वस्तु घेण्यासाठी मागे लागला तर हा त्या वस्तु मध्ये काही ना काही तरी प्राब्लेम काढायचा, नाहीतर मग त्याच्या डिझाईन मध्येच फॉल्ट काढणार, तिथुन ही निसटला तर मग त्यामध्ये दुसरे रंग मागणार किंवा मग पॅटर्न. अशा पळवाटा शोधुन काढण्यात तो एक हुकुमी एक्काच बनला. आणि त्याच्यामुळे पुढे आमची बरीच संकटे टळली. तर दुसरा मित्र गरम डोक्याचा डायरेक्ट भाव सांगणार, उत्तर हो किंवा नाही म्हणजेच डील ओर नो डील, विषय संपला. त्यामुळे ह्याला जरा लांबच ठेवावे लागते. आणि आम्ही आपले बाकीचे हळुहळु जोर लावत हव्या त्याच भावांत खरेदी करायचे. यासगळ्यांमुळे कोणालाही काहीही खरेदी करायचे असले की आमच्याशिवाय शक्य नाही.

अशा या पदधतीमुळे भले कोणा-एकाला एखादी गोष्ट घ्यायची असली तरी, निघाले सगळेजण एकत्र. एखाद्याचा वाढ्दिवस, आई-वडीलांना, गर्लफ़्रेंडला किंवा बॉयफ्रेंडला गिफ्ट अशी खरेदी नेहमी असायचीच. त्यामुळे एकमेकांना कंपनी तर रहायचीच, खरेदीही व्हायची आणि बरोबरीने पार्टीसोबत मजासुदधा. फक्त या सगळ्या मध्ये एक धोका हा असायचा की, निघताना जी गोष्ट घ्यायची असते ती सोडुन बाकीच्यांचीच नको तेवढी सगळी खरेदी झालेली असायची आणि खरी घ्यायची गोष्ट राहुन जायची, असे हमखास व्हायचेच.

जेव्हा कधी एखादी विशिष्ट वस्तु किंवा ड्रेस घ्यायचा असेल, तर तो ऎनवेळी पुण्यातील सगळे मॉल, दुकाने, बाजारपेठा पालथे घातले तरीही मनासारखे काही मिळतच नाही. शेवटी फारच गरज असली तर कामचलावु म्हणुन घेतले जाते आणि परत नंतर कधीतरी मात्र अचानक तीच पाहिजे असलेली वस्तु भारी-भारी प्रकारत दिसते. तेव्हा मात्र एकदम वाईट वाटते, जेव्हा पाहिजे तेव्हा कशी नाही भेटली. असो अशा अ‍ॅण्टीक आवड असणारेही बरेचजण आहेत, की ज्यांच्यासाठी एकाच दिवसात पुण्यातले सगळे मॉल पालथे घातले जातात पण मनासारखे काहीच भेटत नाही.

त्यामुळे एवढे मात्र ठाम लक्षात आले की ठरवुन खरेदी करायला गेले तर नक्कीच पाहिजे ते, आणि पाहिजे तसं भेटत नाही. पण तेच अगदी सहज फिरता-फिरता आरामात भेटते. त्यामुळे एरवी फिरताना एखादी गोष्ट आवडली, की ती नक्की खरेदी करावी हा जणुकाही फंडाच बनुन गेला आहे, कारण ठरवुन खरेदीसाठी गेलं तरं मनासारखं खरेदी होईलच असं नाही.                 

हे सर्व खरेदीचे गुर्‍हाळ गेल्या एक-दोन महिन्यांत मात्र फारच वाढले. किंबहुना असा एकही दिवस नाही की, त्यादिवशी नवीन काहीच घेतले नाही. अर्थांत त्याला नवीन घर आणि घरांच्या कामावेळी सतत लागणार्‍या वेगवेगळ्या गोष्टींची गरज हेच होत. पण त्यामुळे आपल्याला कधीही न लागणार्‍या किंवा स्वप्नात सुदधा त्या गोष्टींचा आपण विचार करत नाही त्या गोष्टी खरेदींचा आणि ते मार्केट समजुन घेण्याचा अनुभव मिळाला. आणि त्यामुळे Responsibility gives you Maturity म्हणजे नक्की काय ते समजले. 
खरेदी करताना बर्‍याचदा काही गोष्टी ह्या मॉलपेक्षा बाहेर रस्त्‍यावरच घेण्याचा आमचा जास्त अट्टाहास असतो. हा आता या गोष्टीसाठी आमच्या सगळ्यांमध्ये बर्‍याचदा तु तु- मै मै होते. पण तरीही शक्य तेवढ्या जास्तीत गोष्टी ह्या बाहेर म्हणजे रस्त्‍यावरच खरेदी करण्‍याचा प्रयत्‍न असतो. त्यामागे फार वेगळा असा हेतु नसतो, आपण मॉलमध्ये काही गोष्टी नाही खरेदी केल्यातर त्याचं फारसं काही कशाला, तर काहीच नुकसान होणारं नाही म्हटले तरी चालेल. पण तीच खरेदी जेव्हा आपण रस्त्यावर करतो तेव्हा तिथे विकणार्‍याला मात्र त्याचे मोल मात्र नक्कीच जास्त असते, त्याहीपेक्षा त्याला कदाचित त्यांची जास्त गरज असते. आपण बाहेर खरेदी करुन त्यांना मदत करतो किंवा जगवतो हा भाग यामध्ये मुळीच नसतो, पण कित्येकांना त्यांची गरज असते, हे साधं थोडे मार्केटमध्ये फिरलं की आपल्याला समजुन येतं. 

बाजारात कधीतरी फसावं लागतं, फसवावंही लागतं आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे कधीतरी फसवुनही घ्यावं लागतं.
    कारण जो रोज १००० कमवतो, त्याला तुम्ही १ दिला तर त्याला त्यांची किंमत गौनच, पण जो १० कमवतो त्याला तोच १ दिला तर त्याला त्याची जास्त किंमत राहते, आणि त्याला त्याची जास्त गरजही असु शकते. त्यामुळे बर्‍याचदा एखाद्या वस्तुची किंमत माहिती असुनसुद्धा जास्त पैसेही दिले जातात, आणि तेव्हा बाकीचे मित्र मात्र आमचे मार्केटचे असणारे नोलेज आणि भाव करण्याची कला ह्यांच्यावर हास्याचा फ़डशा पाडतात.

     त्याहीपेक्षा जास्त इथे खरेदी करताना येणारी मजा, भाव करताना होणारी चढ-उतार आणि तेव्हा दोघांचेही expression आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे असलेल्या भावात वस्तु घेतल्यानंतर होणारा युध्द जिंकल्याचा आनंद. ही मजा कुठल्याच मॉलमध्ये नक्कीच येणार नाही.
ह्या रस्त्‍यावरच्या खरेदीनंतर बाहेर खाणे होणार नाही, हे शक्यच होणार नाही. कारण खाण्यासाठी दिवस काय किंवा रात्र काय कुठेही गाडी काढुन तयार असलेली असे सर्वच शौकीन. मग त्या खाण्यांच्या मैफीलीत काहीही असु शकते, वडापाव पासुन सुरुवात होऊन कांदा भजी ते अगदी मिसळ-भेळ. नाहीतर पाणी-पुरी, शेवपुरी-दहीपुरी पासुन पुढे आईस्क्रीम, सामोसा, कचोरी काहीही. फक्‍त या सगळ्यांमध्ये कच्छी-दाबेली वाला कुठे भेटु नये एवढीच बाकीचे सर्व काळजी घेतात, कारण ती जर भेटली तर मग पोटभरेस पर्यंत नक्कीच थांबत नाही, याची सगळ्यानांच खात्री पटलेली आहे.




     

कृष्णाई

1 comment:

  1. खरेदीचा काहीना जणांना कंटाळा येतो, काहीना मजा वाटते, तर आमच्यांसारख्या खरेदीसाठी वेड्या असणार्यासाठी खरेदी म्हणजे ऑक्सिजनच असतो, की जो सतत काही दिवसांनी घ्यावाच लागतो. पण सणासुदीला मात्र प्रत्येकाला खरेदी आवडो किंवा ना आवडो करावीच लागते की ज्याला काही ऑपश्नच नसतो.
    अशाच काही किस्स्यांसोबत नक्की वाचा नवीन ब्लॉग:- रस्त्यावरची खरेदी आणि खाणं...
    Once Read you will really enjoy it.

    ReplyDelete